प्रेमानंद गज्वी (१९४७-ह्यात) हे नव्वदोत्तरी मराठी नाटककार, लेखक व कवी आहेत. सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून समाजातील विदारक सत्य प्रभावीपणे मांडणे यासाठी ते प्रसिद्ध आहेत. त्यांच्या “घोटभर पाणी” या एकांकिकेचे १४ भाषांत अनुवाद झाले आहेत व “किरवंत” या त्यांच्या नाटकाचे अन्य भारतीय भाषांत भाषांतर झाले आहे. त्यांच्या लेखांचा शालेय अभ्यासक्रमात समावेश झाला आहे.
पुरस्कार: वि. वा. शिरवाडकर पुरस्कार, मसापचा जीवनगौरव पुरस्कार.
नाटके: किरवंत, गांधी आणि आंबेडकर, छावणी, जय जय रघुवीर समर्थ, डॅम इट अनू गोरे, तन-माजोरी, देवनवरी, नूर महंमद साठे, शुद्ध बीजापोटी.
कथासंग्र: ढिवरडोंगा, लागण
कादंबरी: जागर, हवे पंख नवे
५ नोव्हेंबर – मराठी रंगभूमीदिनाचे औचित्य साधून रंगभूमी/थिएटर, कला, प्रतिभा याविषयावर ड्रामा स्कूल मुबईच्या वतीने निलम सकपाळ हिने सुप्रसिद्ध नाटककार प्रेमानंद गज्वी यांच्याशी संवाद साधला आहे.
प्रश्न: मराठी रंगभूमी दिनानिमित्त रंगभूमीची आजची स्थिती गती याविषयी तुमचे काय मत आहे?
गज्वी: नाटक हे फार गंभीर माध्यम आहे. रंगभूमीचा हेतू आहे जो प्रामुख्याने प्रबोधन आहे, हे विसरून चालणार नाही. आपण मराठी नाटकाची परंपरा सांगताना विष्णुदास भावेंपासून सांगतो. खरंतर त्यांच्या आधीही कर्नाटकामध्ये मराठी रंगभूमी होती. त्याचाही उल्लेख आपण केला पाहिजे. रंगभूमीबद्दल आपण फार विचार करत नाही. मराठी नाटक जगाच्या पाठीवर कुठेही होत असेल किंवा पूर्वी झाले असेल, तर त्याचाही विचार आपण केला पाहिजे. त्याचा हेतू असा की, मराठी माणसे तेव्हा काय करीत होती? त्या-त्या काळातले सामाजिक आणि सांस्कृतिक आयाम काय होते, हे समजण्यासाठी नाटक हे उत्तम माध्यम आहे. त्यामुळे रंगभूमीकडे केवळ मनोरंजन अशा संकुचित दृष्टीने बघणे आधी थांबवले पाहिजे. दुसरे असे की गंभीरपणे नाटक लिहिणारी नाटककार मंडळी शोधावी लागतील. जे नवीन प्रश्न निर्माण झालेत, त्यावर नाटकाच्या माध्यमातून आज भाष्य करणारे कोण डोळ्यासमोर येतात? नोटबंदीला एक वर्ष पूर्ण झाले. नोटाबंदीच्या अनुषंगाने, जगण्याची जी एकूण उलथापालथ झाली त्यावर कुणी नाट्यभाषेतून व्यक्त झालेय का? त्याविषयावर आधारित प्रायोगिक का होईना, नाटक आले का? व्यावसायिक रंगभूमीला पर्याय म्हणून आपण काहीतरी निर्माण करू पाहत होतो. पण अगदी अमोल पालेकर यांच्यापासून ते अगदी विजय तेंडुलकरांच्या काळापर्यंत प्रायोगिक रंगभूमीचा पर्याय म्हणून विचारही केला गेलेला नाही, काही ठोस उभेही केले गेले नाही. त्यामुळे झाले असे की ही प्रायोगिक रंगभूमी आपोआप व्यावसायिक रंगभूमीत विलीन होत गेली. या दृष्टीने विचार करणारे लोक आपल्याकडे नाहीत असे नाही, पण पुरेसे गंभीर नाहीत.
प्रश्न: नाटकवाले आता फक्त उत्सवी मानसिकतेत रमले आहेत किंवा फक्त अवार्ड्स फंक्शनला एकत्र येताना दिसतात. त्यांना एकमेकांच्या कामाबद्दल तितकं कुतूहल किंवा आस्था उरली नाहीये. तुमचे या बाबतीत काय निरीक्षण आहे?
गज्वी: हो आपल्याकडचे लोक पूर्वीपासून उत्सवप्रेमी राहिले आहेत आणि आता तर आपल्याला रोज म्हटले तरी साजरा करायला ‘उत्सव’ हा लागतोच. सणवार नसला तर आपण आई-बाबांचा दिवसही (Mother’s Day – Father’s Day) मोठ्या जल्लोषात साजरा करतो. मग नाटक करणारी मंडळी याला कसा अपवाद ठरतील? रंगकर्मीसाठी सगळ्यात मोठा सण कोणता तर राज्यनाट्य स्पर्धा. डिसेंबर महिना तर पर्वणीच. अशा स्पर्धांसाठी छोट्या संस्था सोडाच मोठ्या व्यावसायिक संस्था सुद्धा नव्याने नाटक करतात. या महोत्सवासाठी नाटके पुनरुज्जीवीत केली जातात. गोष्ट अशी आहे की, स्पर्धेत पुरस्कार प्राप्त नाटक असेल तर नाटकाचे पुढे बुकिंग वाढते. म्हणजे प्रेक्षक सुद्धा कोणती नाटके पाहणे पसंत करतो तर ज्यात नावाजलेले चेहरे असतील, ज्या नाटकाला पुरस्कार मिळाले असतील, अशी नाटके. म्हणजे चांगल्या नाटकाचे आपण आज जे काही निकष लावतो ते समाधान देणारे नक्कीच नाही. समजा एखाद्या मोठ्या नाट्यसंस्थेने एका कलाकृतीतून पुरेसे पैसे कमवलेत, तर तिने पुढच्या वेळेस नवीन नाटककाराचे नाटक करायला काहीच हरकत नाही. पण असे करायला कोणीही धजावत नाही. स्पर्धेत पुनरुज्जीवीत नाटकासोबत नवीन लिहिलेली नाटकेही असतात. पुन्हा पुनरुज्जीवित नाटकाच्या नाटककारालाच पुरस्कार मिळतो. ज्या नाटककाराला प्रमोशनची गरजच नाही, अशा नाटककाराला पुरस्कार देऊन काय साधतात? मग नवीन नाटककाराला प्रोत्साहन कसे व कधी मिळणार? नकळतपणे आपण पुन्हा जुन्याच गोष्टींचे समर्थन करीत आहोत की काय? एकीकडे आपण गॅझेटच्या आधुनिक काळात जगतो आणि नाटकं मात्र आपण जुनीच पाहतो. म्हणजे आपले मन अजूनही मागे कुठेतरी इतिहासातच रेंगाळते आहे का? तोच इतिहास पुढे घेऊन जायचे का? मग आपण सातत्याने ज्या प्रश्नाविषयी बोलतो की “कलेसाठी कला की जीवनासाठी कला?” तो प्रश्न या उत्सवी मानसिकतेमुळे मागे पडत आहे असे माझे प्रामाणिक मत आहे. आणि फक्त एका नावाजलेल्या पुरस्कारासाठी सारा लेखनप्रपंच किंवा एकूण नाट्य व्यवहार चालताना दिसतोय. पूर्वी राज्यनाट्य स्पर्धेसाठी लोक गांभीर्याने, किमान काहीतरी वेगळा प्रयत्न करायचे. ते आत्ताचे लोक करताना दिसत नाहीत. कला सादरीकरणाऐवजी एका गर्दीत स्वतःला ढकलणे व स्वतःला सिद्ध करणे चालू आहे असे वाटते. रंगभूमीचा एकूण विचार न करता सुटसुटा-स्वतःपुरता विचार केला जातोय असे वाटते.
प्रश्न: आज लेखकाने, नाटककराने समाजात जे काही घडतंय त्याविषयी बेधडकपणे काही लिहिले तर त्याच्या नाटकाचे, चित्रपटाचे पोस्टर्स फाडले जातात. एक जत्था संतापलेल्या अवस्थेत येतो व नाट्यगृह– चित्रपटगृह जाळण्याच्या धमक्या देऊन जातो. याचा अर्थ आज पॅरलल सेन्सॉरशीप अधिक स्ट्रॉन्गली वाढत चालली आहे का? आत्ताच्या काळातील नाटककाराने याला कसे भिडावे?
गज्वी: ही जी पॅरलल सेन्सॉरशीप आहे ती आत्ता अधिक वाढलीये असे नाही, तर ती आधीपासूनच होती. विजय तेंडुलकरांच्या काळातही ती तितकीच कार्यरत होती. तेंडुलकरांना त्यांच्या सखाराम बाईंडर आणि घाशीराम कोतवाल या दोन नाटकांच्या बाबतीत सेन्सॉरशीपच्या रोषाला सामोरे जावे लागले. बरं या सगळ्या प्रकाराला धैर्याने सामोरे जाणारे लोक आपल्याकडे आहेत. पण शेवटी जीवाची भीती हा एक भाग राहतोच. कोणीतरी येईल, आपल्या तोंडाला काळे फासेल, ही भीती कायम डोक्यात घर करून असते. आणि अशी भीती निर्माण करणारा एक गट समाजात अस्तित्वात आहे, हे फार खेदाने म्हणावे लागते. आपल्यात अजूनही वैचारिक प्रगल्भता आलेली नाही, याचे हे लक्षण आहे. ही विरोध करणारी मंडळी, ज्या नाटकाला विरोध करत असतात ते नाटक नेमके काय आहे, नाटककाराने काय मांडलेय हे न बघताच विरोधी भूमिकेत जातात. ती कलाकृती बघण्याचीही तसदी घेत नाहीत. काय होतं की असे केल्याने पटकन टीव्ही चॅनलवर कुठेतरी झळकायला मिळते. त्यांच्या संघटनेचा मालक असतो, त्यालाही काहीतरी उद्योग हवे असतात. संघटनेतील मुलांसाठी काहीतरी काम हवं असतं. मग हे असे सोपे मार्ग जास्त वापरले जातात. यांचे कलाकृतीला विरोध करण्यामागचे कारण काय तर त्यांच्या समाजाच्या एखाद्या स्त्रीच्या चारित्र्यहननाचे म्हणा, किंवा वास्तवात ती जर तशीच घडलेली गोष्ट असेल तर ती तशीच लोकांपर्यंत पोचण्याची भीती यांना वाटत असते. पण ते दुसरी चांगली बाजू लक्षात घेत नाहीत की या कलाकृतीमधून त्या त्या कालखंडामधला एखादा पट, त्यावेळची माणसे, त्यावेळची सामाजिक –सांस्कृतिक परिस्थिती आपल्यासमोर येईल. याउलट आपली व आपल्या समाजाची बदनामी होईल, हीच भीती त्यांना अधिक असते. यानिमित्ताने सांगावेसे वाटते की लेखकाची दुसरी एक जबाबदारी आहे. ती लेखकाला टाळून चालणार नाही. त्याने एखादी कलाकृती निर्माण करताना, सत्य शोधलेय का? आणि त्या सत्यासाठी/ ते सत्य समाजासमोर आणण्यासाठी तो आपला जीव गमवायला तयार आहे का ? समजा तसा प्रसंग आलाच, तर लेखकाला छातीठोक पणे सांगता आले पाहिजे की, हे मी लिहिलेले आहे, हे-हे त्याचे पुरावे आहेत. लेखकाला आपल्या कलाकृतीच्या बाजूने कोणत्याही बिकट परिस्थितीत उभे राहता आले पाहिजे.
प्रश्न: पण समजा एका लेखकावर संकट आलेच असे चित्र दिसते की दुसरा लेखक त्याच्या मदतीला धावून जात नाही. मराठी रंगभूमीवर अजूनही लेखकांचा प्रेशर ग्रुप नाहीये. त्यांची युनियनच नाहीये. लेखक हा सर्जनशील असूनही त्याच्याबाबतीत ही विषमता का?
गज्वी: हा खरं म्हणजे सांस्कृतिक प्रश्न आहे. आणि हा प्रश्न फार जुना आहे. आपल्याकडे याला सांस्कृतिक युद्ध असा शब्द आहे. काही नाटककार सुरक्षित तसेच प्रस्थापित आहेत तर काही नाटककार जैसे थे आहेत. कारण कलेच्या बाबतीतही आपल्याकडे विशिष्ट गटाची मक्तेदारी असलेली दिसते. त्यामुळे एका नाटककाराच्या मदतीला दुसरा नाटककार धावून जाईलच असे नाही. आपल्याकडे ज्या लेखकांसाठीच्या संघटना आहेत, त्यांचे काम मर्यादित स्वरूपाचे आहे. त्यांचे चित्र फारसे आशादायी नाही. अमुक सिनेमाने शंभर कोटी कमावले नि दोनशे कोटी कमावले असे आपण सर्रास ऐकतो. पण मग लेखकांच्या मानधन वाढीसाठी अशा संघटना काही काम करतात का? अशा स्वरूपाचा एखादा प्रस्ताव सरकार दरबारी गेला आहे का? इथली नाट्यपरिषद तर नुसती नावाला आहे. छोट्या संस्था जशा छोट्या छोट्या नाट्यलेखन स्पर्धा भरवितात तसे नाट्यपरिषद सुद्धा अशा स्पर्धा भरवितात. ते तुमचे कामच नाहीये. त्यासाठी छोटे गट, स्थानिक संस्था आहेत. तुम्ही काहीतरी मोठे काम करा ना. ते होताना दिसतच नाहीये. नाटककाराच्या प्रमोशनसाठी सोशल मिडियाचा किती चांगल्याप्रकारे वापर करतात? तर नाही. संघटनेचा वर्धापन दिन साजरा करण्यापलीकडे यांचा काही कार्यक्रम नसतो. अशा संघटना नवीन तरुण नाटककारांकडून जे पैसे घेतात त्या पैशाचा योग्य विनिमय होतो का? आपल्या कार्यपद्धतीत किती सातत्य ठेवतात? त्यांचे लेखन कसे सुधारेल यावर काही नवीन क्लुप्त्या शोधून काढल्या जातात का? हे सगळे प्रश्न निरुत्तरच आहेत. म्हणून आपण मराठी रंगभूमीबाबत एकूण विचार करतो तेव्हा फारसं हाती काही लागत नाही.
प्रश्न: लेखकाने लिहिताना न्युट्रल होऊन लिहावे का? आपली विचारधारा बाजूला ठेवून लिहिता येणे त्याला शक्य आहे का?
गज्वी: मला नाही वाटत की नाटककाराला न्युट्रल होऊन लिहिता येत असेल म्हणून. पण असे जर कोणाला वाटत असेल तर आधी आपल्या समाजात बदल करावे लागतील. भ्रष्टाचार दूर करावा लागेल. जातमानसिकता बदलावी लागेल. हे काम अगदी मूळाशी जाऊन, आपले जगण्याचे सगळे ठोकताळे बदलून करावे लागेल. माणूस म्हणून तुम्हाला न्युट्रल राहताच येत नाही. जन्मापासूनच काही विशिष्ट जाणीवा घेत-घेत माणसाची वाढ-विकास झालेला असतो. तुमची काही मते-धारणा तयार झालेल्या असतात. त्यातूनच लेखकाला विषय सुचत असतात. अशाप्रकारे लिहिण्यापूर्वी त्याच्याकडे प्रश्नांचा, विचारांचा, भावनांचा, खूप साठा तयार असतो. ज्याच्यावर त्याची पुढची लेखनप्रक्रिया अवलंबून असते. आणि समजा एखाद्याला असे काही लिहायचे आहे, जे त्याच्या आजवरच्या जगण्याचा भाग नव्हते, उदाहरणार्थ मला जर आदिवासी जीवनावर नाटक करायचे आहे, आणि मी त्यापासून पूर्णपणे अलिप्त असेल, तर मला लिहिण्यापूर्वी आदिवासी जीवन बारकाईने समजून घेतले पाहिजे. त्यावरची पुस्तके वाचणे, त्यासंदर्भात वेगवेगळ्या लोकांच्या भेटी घेणे, हा सगळा अभ्यासाचा भाग केला पाहिजे. जेव्हा मी हे आदिवासी जगणे ७०-८० टक्के समजून घेईन, तेव्हा कुठे त्याचा ४०-५० टक्के भाग माझ्या लेखनात उतरेन. त्यामुळे अलिप्त राहून लिहिणे हे मला जरा विचित्र वाटते. लिहिण्यासाठी एखाद्या गोष्टीची वेदना होणे गरजेचे आहे.
प्रश्न: ही सगळी परिस्थिती सुधारण्यासाठी सरकारची मदत होऊ शकते का?
गज्वी: निश्चितपणे होऊ शकते. सरकारकडे कलाक्षेत्रासाठी जो निधी असतो त्याचा योग्य दिशेने वापर झाल्यास परिस्थिती नक्की बदलेल. पण मूळ दुखणे हे आहे की आपल्या सरकारला राज्यनाट्य स्पर्धेच्या पलीकडे काही करावेसे वाटत नाही. त्यापेक्षा काही व्यापक स्तरावर काही करता आले तर तसे करावे. पुरस्कार वगैरे गोष्टींवर पैसा खर्च करण्यापेक्षा योग्य नाटककाराची निवड करून त्याला नाट्यलेखनासाठी विद्यावेतनाची (फेलोशिपची) तरतूद करावी. त्याला लेखन करण्यास प्रोत्साहन द्यावे. मुळात सरकारला सुद्धा कलाक्षेत्राविषयी माहिती हवी-आस्था हवी. तेव्हा कुठे तो वेगवेगळे उपक्रम राबवू शकतो. आणि प्रत्येक गोष्ट शासनानेच केली पाहिजे, असे नाही. आपणही काही जबाबदारी घ्यायला हवी. आपण खूप ढोबळमानाने बोलतो. यावर खूप वेगळ्या पद्धतीने काम करावे लागेल.
प्रश्न: याला जोडून, तुम्ही बोधी रंगभूमीची मुहूर्तमेढ रोवली, तीही वेगळ्या पद्धतीचे काम करणारी आहे?
गज्वी: याच्यासाठीच आहे खरं म्हणजे. खरी गंमत काय आहे ना, कलेसाठी कला की जीवनासाठी कला? असा वाद आपण घालतो. तर मी एक पाऊल पुढे जाऊन असे विधान करतो की –‘ज्ञानासाठी कला.’ हे थर्ड डायमेंशन शोधून काढले. आता हे काय माझं स्वतःचं अनालिसिस नाहीये. असं पटकन सापडलेलं नाहीये. तर बुद्धाने फार पूर्वी एक गोष्ट करून ठेवलेली, ती म्हणजे बुद्धाला ज्ञान प्राप्ती झाली होती. म्हणजेच शोध घेतला तर प्रश्नांची उत्तरे सापडतात. मग त्याच पद्धतीने ‘बोधी’ नाट्य संस्था काम करते. ती नाटककारांचा शोध घेते. ‘बोधी’ने महाराष्ट्र भर कथा-कविता-नाट्यलेखन कार्यशाळा केल्या. यात जवळपास २५० ते ३०० लोक जुडले गेले. यांच्यापैकी ज्यांनी कोणी लेखन केले, त्यावर आम्ही पुस्तक काढले– ‘आर्ट फॉर नॉलेज’ अशा शीर्षकाचे. त्यात ६-७ नाटककर आम्हाला दिसले. ते ‘बोधीचे’ खास असे मेंबर नाहीत. आम्ही त्यांचा प्रचार-प्रसार करतो अशातलाही भाग नाही. आम्ही काय करतो तर त्यांना बोधी नाट्यलेखन कार्यशाळेनिमित्ताने नाटक लिहायला प्रवृत्त करतो. कार्यशाळेत आम्ही त्यांच्या नाटकाचे वाचन करतो, त्यावर साधक बाधक चर्चा करतो. यातून नाटककाराला आपल्या नाटकातल्या उणीवा किंवा चांगली बाजूही स्पष्ट होण्यास मदत होते. त्याला पुढे लिहिण्याची उर्मी त्यातून मिळते. पुढे आम्ही त्या नाटकांचा महोत्सव केला. महोत्सवातून जी नाटके तयार झाली त्यात काहींनी स्वतःची पुस्तके काढली. याचाच अर्थ कोणत्याना कोणत्या प्रकारे ही नाटकलेखन प्रक्रिया चालू राहिली पाहिजे. तिच्यात खंड पडता कामा नये. आणि आपल्या आधीच्या नाटककारांनी जे काम करून ठेवले आहे, त्याच्या पुढे जाणे अपेक्षित आहे. जे आम्हांला जमले नाही ते त्यांनी करावे. त्याला आपली स्वतःची. स्वतंत्र वाट निर्माण करावी लागेल कारण कला ही अशी गोष्ट आहे जी नुसती आशा व्यक्त करून उपयोगी नाही तर कलेला वारंवार सिद्ध करावं लागतं.
ही मुलाखत अक्षय शिंपीमुळे शक्य झाली आहे. अक्षय, द ड्रामा स्कूल मुंबईचे विद्यार्थी संयोजक आहेत